आनंदवारी
फोनची बेल वाजली, म्हणून सुलू चूल सारवता सारवता उठली. पाहते तर लक्ष्मी अक्काचा फोन, "हं बोला अक्का."
"आवरलीस? अग वारीला जायचं ना."
त्या असं म्हटल्यावर सुलू खडबडून जागी झाल्यासारखी झाली. "अं हो हो यायचं आहे"
"मग तयारीला लाग, तीन चार दिवसात निघायचं आहे"
"बरं बरं ठीक आहे मी आणिक उद्या फोन करते."
सुलू सर्व काम आवरून अंथरुणावर आडवी पडली. दोन दिवसात घरातील तयारी करून ठेवावी लागणार होती. त्याचे नियोजन तिच्या मनात सुरू झाले. पण अंथरुणावर पडल्यावर मागील वारीचा झालेला अनुभव जशाच्या तसा तिच्या मनःपटलावर येऊन दाखल झाला. मागील तीन वर्षांपूर्वीची ती वारी. लक्ष्मी अक्काने बळेच करून पायी वारी पंढरपूरला नेले, घरात तीन लेकरं, नवरा, सासू, सासरे असल्याने तिला चिंता अशी करण्याची काही गरज नव्हती. लक्ष्मी अक्का म्हणजे तिची मोठी चुलत नणंदबाई, कृष्णाची निस्सीम भक्त, दररोज न चुकता देवदर्शन, हरिपाठ हा तिचा नित्यक्रम घरातील, शेतातील कामे करूनही तिचे हे चुकत नव्हते. संसाराच्या व्यापातून थोडी मोकळी झाली म्हणजे घरात सुनबाई आली तेव्हापासून बाईसाहेब पंढरपूरची वारीही करायला लागली होती. म्हणायची,
"कितीही कमवा बरोबर काहीच येत नाही, पण भक्ती केली तर मनाला, देहाला शांती, समाधान मिळते."
तर अशीही लक्ष्मी अक्का त्यांनी म्हटल्यावर घरचेही कुणी नाही म्हणाले नाही सुलूच्याही मनात नव्हते पण नाही म्हणता आले नाही. सासूबाईं म्हणूते,
"की मी आहे अजून, काम होत्यात मला तसंही शारु आहे हाताखाली माझ्या." शारु म्हणजे सुलूची मोठी(9 वर्ष) मुलगी, गायत्री दुसरी(7 वर्ष) आणि त्यानंतर ओंकार(5 वर्ष) अशी तीन अपत्ये ओंकार म्हणजे सर्वांचा अत्यंत लाडका, म्हणजे जीव की प्राण. नवरा म्हणजे गणेश हा शेतातील कामे करून एक छोटेसे किराणा दुकान चालवीत होता. आणि सुलु ही शेतात कामाला जात होती.
तर असे हे कुटुंब होते अशा या सर्व व्यापातून सुलू वारीला निघाली. बरोबर काय काय घेऊ असं सारं अक्कास विचारून तिने पिशवी भरली. सासुबाई चा भजनाचा टाळ होता, तोही घेतला."अगं सुलू, वनात चांगले इतभर तुळशीचं रोपटं आलंय प्लास्टिकच्या बकीटीत लाव अन ने की डोईवर. तुळशीवर लई भक्ती इठ्ठलाची," असं सासूबाईंचं ऐकून तिलाही वाटलं," या आपल्या तुळशीलाहीं पंढरपूर दिसेल चला घेऊन जाऊ."
जाण्याचा दिवस उजाडला.
सुलूचा पाय निघत नव्हता, पण निघाली, सर्व लेकरांना घरीच ठेवून. वास्तविक जेव्हा आई एकटी गावाला वगैरे जाते तेव्हा ती सर्वात लहान लेकराला बरोबर घेऊन जातो, पण!
हळू हळू दिंडी पुढे पुढे चालत होती. तिचे मनही अत्ता अत्ता या दोन दिवसानंतर वारीत रमू लागले. टाळांचा आवाज, हरिनामाचा गजर, भजनं, भारुड, गवळणी या सर्व धामधुमित तिला संसाराचा विसर पडला.
प्रत्येक स्त्री संसारात स्वतःला किती गुरफटून घेते. सकाळी उजाडल्यापासून रात्री धरणीवर निजेपर्यंत तिला घराचीच काळजी असते. मुलांच करणे, नवऱ्याचं करणे. घरातील वडील मंडळी सासूबाई, सासरे यांचे करणे वेळप्रसंगी दुखणी खुपणी करता करता कसा दिवस जातो तिला कळतही नाही. या सर्व व्यापातून सुटण्यासाठी 'वारी' म्हणजे 'माझे माहेर पंढरी' याप्रमाणे पंधरा ते वीस दिवस नुसते हरिनाम घेत घेत मार्गक्रमण करत राहायचे. रोज रात्री झोपताना घरी एकदा फोन करायचा फक्त तेवढाच चार-पाच दिवसानंतर घरून फोन आला तेव्हा शारूने सांगितले, "आय आज ओंकारला ताप आलाय,
तू झोपला आहे, काही खाल्लेलं नाही." हे ऐकून तिला काळजात धस्स् झाले अग त्याला मुरमुऱ्याचा चिवडा दे की करून. नाहीतर बिस्किट पुडा आण.
"आणला पुडा, दोन खाल्ली. गोळी घेऊन झोपला आहे."
असं ऐकल्यावर तिचे चित्त सैरभैर झाले. झोपही लागेना, जीव दमलेला होता पण डोळ्याला डोळा लागत नव्हता.
"अगं वाटंल की बरं, काय चिंता करू नकोस."
म्हणून अक्काने धीर दिला. खेडेगाव असल्याने सारखे दवाखान्यात जाणे परवडत नव्हते. कालच संध्याकाळी नेऊन शहरात नेऊन आणले होते. वारीचा पुढचा दिवसही गेला आज दिवसभर तळ्यात मळ्यात होत होतं. रात्री तिने फोन केला तेव्हा शारुचा आवाज आवाज होतो. दिवसभर पोराची ताप उतरली नाही म्हणून ती सांगत होती. मग तर जास्तच तिचं मन तिला कुरतडू लागलं. डोळेही भरून आले, जेवणात लक्ष लागेना. अक्काचेही आज दिवसभर सूलूकडेच लक्ष होते. त्यांनाही थोडे अपराधीच वाटायला लागले. पण त्यांचा विठ्ठलावर पूर्ण भरवसा होता. त्यांनी विठ्ठलाला हात जोडले आणि म्हणाल्या
"विठ्ठला, आज पर्यंत मी तुझी मनोभावी भक्ती केली आहे. तुझ्या पायावर माझी श्रद्धा आहे. वारीच्या निमित्ताने तुझ्या दर्शनाला येणार आहे. या माऊलीची चिंता तू दूर कर एवढीच इच्छा करते. हे विठू माऊली तुला सारे कळते मी काही सांगायला नको, माझ्या या वारीला कुठलेही गालबोट लागू देऊ नको. उलट ही वारी आनंदाची होऊ. दे मी पुढील पाच वाऱ्या माझ्या मर्जीने करीन. पण लेकरू उद्या खेळू दे."
असे म्हणून सर्वजनिंनी विठुरायाच्या नावाचा गजर केला. इकडे अचानक रात्री दहा वाजेच्या नंतर अचानक दारावर टकटक झाली. म्हणून गणेशरावांनी दार उघडले, तर दारात एक जोडपे उभे होते. म्हणाले
"नमस्कार मी डॉक्टर वसुधा, मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की इथे कोणी मुलगा आजारी आहे. मला इकडे जायचेच होते, म्हणून मग चेकअप करावे."
असे तिने सांगितले. गणेशराव थोडे गोंधळले, काय करावे ते कळेना.
"हा हाय कालपासून त्याला ताप हायी, शहरात दवाखान्यात नेलतं, पण ताप अजून हायी."
"मला चेक करायचे आहे म्हणजे बघायचे आहे."
मॅडमच बोलत होत्या, सर मात्र गप्प होते.
"हा हा यावं मधी भाऊ तुम्ही पण या."
असे म्हणून दोघेही आत मध्ये आले ओंकार समोरच झोपलेला होता. म्हणून मॅडमने थोडाही वेळ न लावता त्याचे चेकअप केले आणि स्वतः जवळचेच औषध दिले. एक डोस लगेच त्यांच्याच हाताने ओंकारला दिला. उद्याची औषधी अन गोळ्या देऊन त्याच्या पाठीवरून हाथ फिरवला. चेहराही प्रेमाने कुरवाळला. क्षणभर त्याला आपली आईच जणू माया करते आहे असे वाटले. "झोप बाळा आता, तुला आता शांत झोप लागेल आणि उद्या तू ठणठणीत बरा होशील." ओमकारनेही मान हलवली आणि लगेच तो आडवा झाला. "दादा उद्या दिलेल्या या गोळ्या त्याला व्यवस्थित द्या म्हणजे आणखी बरे वाटेल, येते मी.
" बसा कि, चहा ठेवतो माझी लक्ष्मी वारीला गेली आहे."
" हो का! नाही असू द्या, साखर ठेवा हातावर चालेल."
असे म्हणून ते दोघे निघून गेले. त्यांची गाडी क्षणात दिसेनाशी झाली. गणेश ने दार लावून घेतले आणि तो पोरा जवळ येऊन आडवा झाला. त्याला आता शांत झोप लागत होती.
भल्या पहाटे सुलूला स्वप्न पडले की रुक्मिणी माता तिच्या ओंकारच्या पाठीवरून हात फिरवून त्याला मायेने कुरवाळत आहे. ती खडबडून जागी झाली आणि विठोबा रुक्माईला अगदी मनाच्या खोल खोल गाभाऱ्यातून नमस्कार केला. आणि त्या क्षणाची म्हणजे भेटीची विठूमाऊलीच्या दर्शनाची अनिवार ओढ तिला लागली. भेटी लागी जीवा असे तिच्या मनात होऊ लागले. सकाळी न राहवून तिने फोन केला,
घरून सांगितले
"त्याचा ताप उतरला आणि सकाळी त्यानी न्याहारी पण केली गोळ्या घेतल्या." तेव्हा मात्र तिच्या मनावरचे ओझे उतरल्यासारखे झाले. समोरचे चित्र स्पष्ट झाले अवघे चिंतेचे मळभ दाटून आले होते ते कुठल्या कुठे पळून गेले आणि सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात विठ्ठलरुक्मिणी माता कमरेवरती हात ठेवून तिच्याकडे पाहत असताना तिला भासले.
नकळत तिने हात जोडले
"भरून पावले मी. माझी वारी आनंदवारी झाली आहे."
असं म्हणून डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले.
|| जय श्री विठ्ठल चरणी अर्पण.||
सौ. शुभांगी सुहास जुजगर.
5 टिप्पण्या
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻😇
उत्तर द्याहटवाThanks
हटवाचित्र डोळ्यासमोर उभं राहतं.. अप्रतिम आनंदवारी
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाफारच सुंदर.
उत्तर द्याहटवा