फॉलोअर

बहरला हा मधुमास : भाग ४

 बहरला हा मधुमास : भाग ४अंतिमभाग


मागील भागात आपण 

अगं खरंच,तु फुलासारखी नव्हेस तर त्यापेक्षाही सुंदर आहेस.आणि म्हणुन तु मला आवडली आहेस."

"नाही, असं काही पण बोलू नकोस.चार चौघासारखे काही तरी बोलावं."ती जरा सावरून म्हणाली.

"हो सई, तु माझ्याशी लग्न करशील?"त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता सरळच विचारले.आता पुढे..


सईला ही त्याच्या तोंडून हे ऐकून फार बरे वाटले होते. 

पण तरीही ती म्हणाली,"कसं शक्य होईल हे? मी एक साधीशी मुलगी आहे. ना माझ्याकडे शिक्षण, ना कोणती मोठी नोकरी? तुला छान नोकरी वाली,मोठी श्रीमंत मुलगी मिळेल. तेव्हा नको. परत विचार कर." 

असं ती डोळ्यातील अश्रू प्रयत्नपूर्वक लपवत म्हणाली. कारण तिला याबाबतीतले टोचणारे अनुभव आले होते.

"माझा विचार करून झालाय. तूच वेळ घे, आणि लवकरात लवकर मला सांग. मी या क्षणापासून वाट बघतो आहे."

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


असे अभयने तिला निक्षुण सांगितले.

"तू मला फारच मोठ्या संकटात टाकले आहेस." लटकाच राग व्यक्त करत ती म्हणाली.

"ते काहीही असो. हो म्हण, किंवा नाही म्हण, परंतु लवकर. अगदी मिनिट्स, तास आणि दिवस हा सगळा हिशोब मी ठेवणार आहे."

…..



सई, जय, आणि आईला गेट जवळ सोडून अभय त्याच्या घरी निघून गेला. जेवणं बाहेर झाले होते. 

घरी आल्यावर सई मात्र गप्प गप्प होती. आईला नेमके काहीच कळेना. 

"सई, अशी का तू शांत शांत आहेस? थकलीस का जास्त?" काळजीपोटी तिने विचारले.

"नाही." असं म्हणताना डोळ्यातले अश्रू मात्र ती लपवू शकली नाही.

तिच्या डोळ्यात अश्रू बघून आईलाही जरा गहिवरल्या सारखे झाले. कारण वडिलांचे छत्र डोक्यावर नव्हतं. म्हणून ती जास्तच भावुक होत होती. मग हे अश्रू? आईला समजेनाच. काय झाले ते?

"आई,अभयने मला लग्नासाठी विचारले आहे. मला काहीच कळत नाही. मी काय करू?" 


तिचं हे बोलणं ऐकून जय ही तिच्याजवळ येऊन बसला. 

आणि म्हणाला,"अगं दीदी, मीच तुझ्यासाठी नवरा शोधत होतो. मी माझ्या दोन-तीन मित्रांना सांगूनही ठेवले होते,की, दीदी साठी चांगला मुलगा असेल तर मला सांगा म्हणून ." 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

थोडे थांबून परत जय म्हणाला,"तू आता आमची काळजी करू नकोस दीदी. तुझं लग्न आता व्हायला पाहिजे. अभय चांगला वाटला मला. त्याचा जॉबही चांगला आहे." जयने स्पष्टीकरण दिले.

आई मात्र गप्प राहून या दोघांचं बोलणं ऐकत होती. जय मध्ये आलेले शहाणपण न्याहाळीत होती. 

तिच्यासाठीही ती आणि तिची ही दोन मुलं, एवढेच विश्व होते. 'मुलीच्या डोईवर आता अक्षदा पडायला पाहिजे' याचा तीही विचार करतच होती. आईकडे पाहून सई म्हणाली, "आई तू बोल ना काहीतरी. तुला काय वाटतं आह?"

"तुझ्या लग्नाचं आता बघायला पाहिजे. तुझ्या मनात असेल तर आम्ही दोघेही नाही म्हणणार नाहीत. आणि नसेल तर तसेही सांग."

आईने तिचे मत व्यक्त केलं. यावर सई म्हणाली,"आई तू पण जय कडूनच बोलते आहे."

"नाही. नाही जय कडून नाही. मलाही योग्यच वाटत आहे. तुला सांगू का, मला तो पहिल्यांदा बघितला तेव्हाच आवडला आहे. जावई म्हणून.. तुझं मला माहित नाही.." असं म्हणून आईने तिच्या मनाला गदगदुन हलवण्याचा प्रयत्न केला. खरं बाहेर यावं म्हणून. आईचे हे बोलणे ऐकून मात्र, तिने आपला चेहरा आईच्या कुशीतला लपवला. त्यावेळी तिच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता 

आई म्हणाली,"हो बाळा, जवळजवळ दहा वर्षापासून तू, न थकता कष्ट करून, या घराला पेललं आहेस. पण आता बास तुझं आयुष्यही मार्गाला लागलं पाहिजे ना. तुझे स्वप्न खरं होणार आहे. लाल गुलाब रुपी सौभाग्य तुला साद घालते आहे." ती कुशीत आईचे हे बोलणं ऐकत होती. मात्र मनात म्हणत होती, माझ्या मनातलं हिने कसं ओळखलं?

काही वेळ थांबून परत आईच म्हणाली, "तुझं मत सांग. बोल मनातलं. तुला नको असेल तर नाही. पण मनात ठेवू नको. हे नाही तर दुसरे बघते."

 हे ऐकून ती म्हणाली, "नाहीऽ, नको. दुसरे नको. मी करेन अभयशी लग्न." तिचं हे वाक्य ऐकून जय ने टाळ्या वाजवल्या. आणि आईलाही खूप खूप आनंद झाला. 

ती बाप्पाला हात जोडत म्हणाली,"बाप्पा तुम्हीच पावलात. आता पटकन हिच्या डोईवर अक्षदा पडू द्या."

हे ऐकुन जय ही या दोघीजवळ येऊन बसला. "अभिनंदन दीदी. खूप खूप अभिनंदन." हे ऐकताना मात्र सई लाजली. आणि तिने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि चेहरा झाकून घेतला.

"फोन करून सांगू का? मग तिकडे?" जय मग तिला छेडण्यासाठी म्हणाला.

"ये नको एवढ्यात, बघू दे ना जरा वाट."

सई म्हणाली.

"हो का! गेल्या दहा वर्षापासून तो तुझीच वाट बघतो आहे."जयने आणखी तिला छेडले.

 ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

"नाही बरं निव्वळ योगायोगाने आमची इथे भेट झाली आहे. योगायोग नाही तुझ्यामुळेच मी इकडे आले." सई.

"बघ, आहे की नाही मी ग्रेट!"जय.

"मग तू तर ग्रेटच आहेस रे भावा." यांचे बोलणे चालू होते, पण आई मात्र उठली.

आणि तिने देवाला साखर ठेवुन नमस्कार केला.

…….


सईचं आणि अभय च लग्न ठरलं. यामुळे अभय खूपच खुश होता. की त्याचे पहिले प्रेम आज त्याला परत मिळते आहे. यामुळे त्याच्या स्वप्नातली राणी ही त्याची होणार होती. आठ नऊ वर्षांपूर्वी केलेले प्रेम, आता हे असे त्याला गवसले होते.

अगदी 'घरच्या घरी साखरपुडा करायचा'

असंच ठरवलं होतं.

सईही, अनपेक्षित पणे समोर आलेल्या या लाईफ चेंज करणार्या घडीचा, हेवाच करत होती. पण तीही मनातुन खूपच आनंदी आणि खुश होती. अगदी कालपर्यंत आपण लग्नाचा विचारही करत नव्हतो. आणि आत्ता…हे सर्व घडत आहे.

तीला या क्षणी, ईशाची तीव्रतेने आठवण येऊ लागली.म्हणुन तीने अभयला मेसेज केला.

फोन नाही केला.कारण तो दोन दिवसांनी ठरलेल्या कार्यक्रमाच्या तयारीला लागला होता.सगळे त्यालाच करायचे होते.दुसरं कुणीही करणारं नव्हतं.

"अगं सईऽ" या आईच्या हाकेने ती भानावर आली.

 "हा बोल गं."सई.

 "जा ना ते पार्लरला. मग दुपारी परत मेहंदी काढायची आहे."

" हो, हो. जाते मामींना घेऊन, थोडा उशीर लागेल." तिने सांगितले.

"अगं म्हणूनच मी लवकर जा म्हणते आहे."

आईने स्पष्ट केले.

 मामा आणि जय हे साखरपुड्याच्या खरेदीसाठी मार्केटला गेले होते. आईचीही घरातील आवराआवर चालूच होती. नवरा गेल्यापासून असे आनंदी आणि सुखाचे क्षण, खूपच कमी आले होते, तिच्या आयुष्यात. पण आताचे हे सुखाचे क्षण, भर भरभरून जगायचे. असे त्यांनी मनोमन ठरवलं होतं.


आज साखरपुडा होता. सईच्या हातावरची मेहंदी खूपच रंगली होती, अभयच्या प्रेमाचा रंग छानच चढला होता.अगदी हाताच्या कोपरापर्यंत डिझाईन काढले होते. खूपच रेखीव आणि सुबक अशी ती दिसत होती. त्या मेंदीत अभयचे नावही तिने टाकले होते. तिलाही हे क्षण आनंदाने जगायचे होते. ही घटना आयुष्यात एकदाच येते. आणि म्हणून खूपच उत्साह आला होता. वडील गेल्यापासून आनंद, उल्हास हा रुसून बसल्यासारखाच होता. तोही तिला आता भरून काढायचा होता. या आलेल्या सुखाच्या सरीत पूर्ण भिजायचे होते. चिंब व्हायचे होते. आवडीच्या व्यक्तीसोबत..

दुःखाच्या वनव्यातून पार होऊन, तिला आता सुखाचा मार्ग मिळाला होता. जणु मोकळे झालेले आकाशच तिला चेअर करत होते.


सुंदर अशी डार्क पिंक कलरची तिने साडी घातली.त्यावर मॅच होईल असा छान ज्वेलरी सेट ही घातला. मोगरा प्लस निशिगंध अशी वेणी तिने केसात लावली.मेदींने रंगलेले हातही खुपच छान दिसत होते.त्यावर नेलपेंट ही लावले होते.आणि हलकासा मेकअप ही केला होता.

पोरींचं हे रुप पाहुन आईच्या नजरेला भुरळ पडल्यासारखं झालं. ही माझी पोरगी इतकी छान आणि सुंदर दिसते आहे असं पाहून तिने स्वतःला चिमटा काढला. आणि तिला कोणाची दृष्टी लागू नये म्हणून कानाजवळ एक काळा ठिपका लावला.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

 सगळे तयार होऊन अभयच्या घरी गेले. तशी त्यांनी मित्रांच्या हाती गाडी पाठवली होती. तिथे छान तयारी चालू होती. त्याच्या घराचा हॉल मोठा होता. तिथे साखरपुड्याची पूर्वतयारी झालेली दिसली.

गेल्या गेल्या अभयच्या आईने स्वागत केले. त्यातही सईचे विशेष असे स्वागत, अभयच्या बहिणीने केले 'ही आता या घराची भावी लक्ष्मी आहे' या नात्याने. तिलाही खूप आनंद झाला होता, की अभयला त्याच्या मनातली राणी मिळाली म्हणल्यावर.

सगळे विधी व्यवस्थित करून घेणारे, असे गणेश देवा ही आलेले होते. 

लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. हळूहळू एक एक विधी झाला. त्यानंतर एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम झाला.

अभय ही खूप छान दिसत होता. आधीच तो रुबाबदार होता. आणि त्यात आता हा प्रेमाचा रंग चढला होता.त्यामुळे तो खूप आनंदी होता.

……


त्यानंतर एक महिन्यानी सई च्या गावी खुप थाटात, पुर्ण विधी वत लग्न झाले.

आणि आज, यांच्या लग्नाचे रिसेप्शन 'तनिष्क हॉल'मध्ये होते.संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत.

 या अभय आणि सई च्या रिसेप्शन पार्टीत जाण्यासाठी सनी आणि ईशा या दोघी माय लेकी तयार होत होत्या.

(ही कथा पुर्ण पुणे काल्पनिक आहे.मी स्वतः लिहिलेली आहे.)


भाग १

भाग २

भाग ३


@सौ.शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या