फॉलोअर

झाले मोकळे आकाश..भाग एक

 झाले मोकळे आकाश..भाग एक



आज संध्याकाळी साडेचारलाच विजय हा ऑफीस मधुन घरी आला. आणि त्याने दोन ड्रेस, आणि काही इतर सामान बॅगमध्ये भरले.

त्याचं असं हे पटापट आवरणं पाहुन,

 वैष्णवी ने विचारले,”काही हवं आहे का?”

“हो, पण काय करणार?”असं तिच्या कडे पाहात विजय म्हणाला.

“म्हणजे? मला नाही कळले.”प्रश्नांकीत चेहऱ्याने ती म्हणाली.

“ती तर समस्या आहे ना!” असं म्हणत त्याने बॅग उचलली आणि तीला म्हणाला,”मी मित्रांसोबत,काही कामा निमित्त पुण्याला जात आहे.उद्या यायला रात्री उशीर होईल.”

असं म्हणत तो लगेच घराबाहेर ही पडला.

# # #

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

विजय आणि वैष्णवी यांच्या लग्नाला सहा महिने झाले होते. पण अजूनही त्यांच्यात, पाहिजे तसे नाते स्थापित झाले नव्हते. दोघांनीही काही दिवस या नात्याला द्यायचे ठरवले होते. कारण ते आपापल्या कोशातून बाहेर आलेली नव्हते.


 विजयचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. बायको गोरी, छान देखणीही होती. बघताच विजयला ती मनापासून आवडली होती. पण लग्न झाल्यावर तिच्या अपेक्षा खूपच उंचावलेल्या होत्या.’मला छान टू बीएच के चा फ्लॅट हवा’ असा तिचा आग्रह होता.’फोर व्हीलर गाडीही हवी,घरात व्यवस्थित फर्निचर हवं, शिवाय घरात नवऱ्या शिवाय इतर कोणीही चालणार नाही.’

 अशा तिच्या अपेक्षा ऐकून विजय काहीच बोलला नाही. गाडी, घर हे योग्य वेळी झालेच असते. पण सबुर नव्हती.

शिवाय विजय हा आई-वडिलांचा एकच मुलगा होता. तिने असं म्हटल्यावर, त्यांनी कुठे जायचे?

मग दररोज घरात या विषयाला धरून वाद होऊ लागले. आणि घरात कोणतेच काम वेळेवर होईना! या सर्व गोष्टींचा त्रास मग सगळ्यांनाच होऊ लागला. सगळ्यांचेच सौख्य हरवले होते. असे घर हे घर राहत नाही.

विजयलाही या सगळ्या गोष्टींचा खूपच मनस्ताप होऊ लागला. आणि त्याचा परिणाम ऑफिस मधील कामावर होऊ लागला. त्याचे कामात लक्ष लागत नव्हती. पर्यायाने बॉसचा ओरडा त्याला पडू लागला.

असेच काही दिवसानंतर, एके दिवशी मग त्याने तिला माहेरी नेऊन सोडली. काही दिवस तिच्यात बदल होईल या अपेक्षेने..पण तिच्यात बदल होण्याची काहीही लक्षणे दिसेना..

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

मग हा सरळ तिला घटस्फोट देऊन मोकळा झाला.

 ‘छान सुंदर बायको असुनही मात्र, तीचे प्रेम आपल्याला लाभले नाही.’अशी खंत त्याच्या मनाला टोचत होती.आणि याचे प्रेम तीला कळले नाही.व्यर्थ हव्यासापोटी..

यामुळे लग्नाचा विषय त्याने बंदच करून टाकला स्वतःपुरता..


# # #


वैष्णवी ही पण एक घटस्फोटीतच होती. योग्य वेळी तिचेही लग्न झाले होते. दिसायला चांगली होती.मध्यम बांधा, गव्हाळ वर्ण.स्वैंपाकाची विशेष आवड होती.तसेच वाचन, लेखन, याचीही आवड होती.

तिच्या घरात दादा, वहिनी त्यांची लेकरे आणि आई, तिला वडील नव्हते.


 नात्यातीलच काही ओळखीच्या लोकांकडून तिच्यासाठीच स्थळ आले. लांबचे होते. दादा वहिनीने पुढाकार घेऊन सगळं पाहिलं. आणि तिचे लग्न करून दिले. लग्न छान थाटामाटात झाले.


 वैष्णवी सासरी आली. तिथे घर वगैरे सगळे छान होते. घरात मेंबरही होते भरपूर. म्हणजे नवरे मुलाला दोन मोठे भाऊ होते. त्यांचेही लग्न झालेली होती. उद्योगाचे घर होते. त्यामुळे मुलगाही तेच पाहत होता. जेमतेम वैष्णवी पंधरा दिवस तिथे राहिली. या पंधरा दिवसात म्हणजे आठ दिवस तर लग्नाचीच गेली. नंतरच्या आठ दिवसात, तिला कोणत्याही कामाला घरात हात लावू दिला नाही. किचनमध्ये तर पायाही ठेवू दिला नाही. नाश्ता जेवण तिला बेडरूम मध्येच यायचे. शिवाय ज्याच्याशी लग्न झाले होते तो म्हणजे नवरा..

त्याचे तर ‘प्रेम हे त्याला माहीत आहे की नाही?’

हाच प्रश्न वैष्णवीला पडला होता.तो म्हणजे नवरा हिला रात्रभर बारीक असा शारीरिक त्रास देत होता.आणि मानसिक ही.शिवाय माझ्या साठी ‘हे कर.’ ‘ते कर.’अश्या त्याच्या ऑर्डरीच तीला दिवसातुन किती वेळा झेलत राहाव्या लागत होत्या.

असेच कसेतरी आठ दिवस तीने काढले.तीला नवऱ्याचे प्रेम कुठेच दिसले नाही. उलट मला या सर्वांस कसा त्रास होईल? हेच तो बघत होता.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

माहेर लांब होते. जवळपास ओळखीचे कोणीही नव्हते. सुरुवातीला वाटले, ‘होईल हळूहळू सगळं व्यवस्थित, त्यांच्याकडचे म्हणजेच इकडचे नियम काही वेगळे असतील, ते अंगवळणी पडायला वेळ लागेल.’

पण ती त्याच्या म्हणजे नवऱ्याच्या विक्षिप्तपणाला वैतागली होती. तो रूम मध्ये आला की तिला संकट आल्यासारखेच वाटत होते. ही व्यक्ती आता माझ्यासोबत काय करेल? असं भलं मोठ प्रश्नचिन्हच तिच्या समोर उभे राहायचे.

 काही दिवसातच भाऊ तिला न्यायला आला. तर त्याचे आगत स्वागतही कोणी नीट केले नाही. 

त्यांनी सांगितले,”मी वैष्णवीला न्यायला आलो आहे.”

तर म्हणाले,” हो घेऊन जा. पण आधी तीच्या नवऱ्याला विचारा. आम्ही कोण सांगणार?”

 हे असं पाहून त्याच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली.


मग उशीर न करताच तो वैष्णवीला घेऊन आला.

 घरी आल्यावर वैष्णवी ने सर्वांना सांगितले, “मला आता परत त्या घरात जायचे नाही. आणि मला ‘जा’ असा कोणीही फोर्स करू नका. मी हात जोडते तुम्हा सर्वांना.”

 तिने असं सांगितल्यावर तिला परत कोणीही या विषयावरून बोलले नाही. किंवा विचारलेही नाही. दोन-चारदा वहिनीने प्रयत्न केला. कारण नणंद किती दिवस पोसणार? पण मग दादांनी वहिनीला सांगितले की ,”मी माझी मुलगी म्हणून सांभाळेल, तू परत तिला या विषयावर काहीही विचारायचे नाहीस. आणि हा विषयही परत तिच्याकडे काढायचा नाही.”

काही दिवसानंतर वैष्णवी ने दादाच्या ओळखीने जवळच असलेल्या पतसंस्थेवर काम करायला सुरुवात केली. यामुळे ती स्वावलंबी झाली. आणि तिच्यासाठी विरंगुळाही झाला. तिच्या सासरहुन दोन-चार वेळा फोन आला. एकदा ती न्यायलाही आली. पण वैष्णवी ने स्पष्ट नकार दिला.

वर्ष.. दोन वर्ष.. चार वर्ष.. पाच वर्ष.. अगदी ऐन तारुण्यात असलेले हे फुलपंखी, मोरपिसी असलेले दिवस तिने विरहिणी बनुन काढले. या काळात तीला अनेक असे घाव मिळाले, की त्याची भरपाईच होऊ शकत नाही.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


एके दिवशी विजयची बहीण कल्पना ही, नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्ताने या गावात आली. लग्न लागल्यानंतर ती आवर्जून वैष्णवीच्या वहिनीला भेटली. आणि तिचा मनोदय सांगितला. तर वहिनींनी तिला घरी येण्यास सांगितले. मग ती घरी आली. तर घरी वैष्णवी आणि आई या दोघी पण होत्या. त्या दोघींना पण ती भेटली. या भेटीत तिला वैष्णवी मनापासून आवडली होती. बोलता बोलता कल्पना म्हणाली,” माझा भाऊ आहे विजय. तर त्याच्यासाठी मी तुमच्या वैष्णवीला मागणी घालते आहे.”

 हे ऐकून आई म्हणाली,”काय??”

“हो माझ्या भावासाठीच मी आले आहे. मला तुमच्या वैष्णवी विषयी कळाले म्हणून मग..” कल्पनाने स्पष्टीकरण दिले.

हे ऐकून आईला एकदम काहिच सुचेना काय बोलावे ते. म्हणून मग त्या म्हणाल्या,”दोन दिवसानंतर सांगतो.” असं ऐकून ती थोड्या वेळाने निघून गेली.



ती निघून गेल्यानंतर, घरात विचार मंथन सुरू झाले. वैष्णवी ने सांगितले,” व्यवस्थित आधी सगळं बघा. नाहीतर परत या वनव्यात जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही.” असे तिने सांगितले. शेवटी आईची आणि वहिनीची इच्छा होती ‘लग्न करावं’

पण भावाने सर्वस्वी तिच्यावर सोडले होते. वैष्णवी ने आईचा आणि वहिनीचा मान ठेवला. 

आणि ती म्हणाली,” मी लग्न करेल. पण काही दिवसच,मी तिथे राहिन, योग्य वाटले तर मी ते नाते निभावून नेईन. अन्यथा मी परत माहेरी येईल. मला तेव्हा कुणीही काहीच विचारायचे नाही.”

अशी अट तिने घातली.


 तिकडे विजयही लग्नाला तयार नव्हता. यावर कल्पनाने त्याला खूप गोष्टी समजावल्या. तेव्हा कुठे हा नवरदेव घोड्यावर बसला. कारण त्यालाही काही गोष्टींची पुनरावृत्ती नको होती.


एकदम साध्या पद्धतीने वैष्णवी आणि विजयचे लग्न झाले. लग्नामध्ये विजयचे आई-वडील आणि त्याची बहीण कल्पना आणि तीचे मिस्टर. एवढेच काय ते माणसे होती.आणि इकडे वैष्णवी कडील तिची आई आणि दादा अन् वहिनी. आणि दादाने मामा व मामी या दोघांना बोलावून घेतले होते.

इतक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा गावच्या देवीच्या मंदिरात, तीच्या साक्षीने संपन्न झाला.


वैष्णवी ची आई मात्र या लग्न समारंभात हसऱ्या चेहऱ्याने आणि आनंदाने वावरत होत्या. पण काठाच्या साडीवरील ब्लाऊज च्या बाह्यांची म्हणजे काठाची काही सुतं कडक असतात. अन् ती ब्लाऊज घातल्या वर कुठेतरी टोचत राहतात. तसे यांचे झाले होते. पोरीने लग्न तर केले होते. पण तीने घातलेली अट अशीच कुठेतरी टोचत होती.


बघु या पुढील भागात काय होते ते.

(ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.)

 भाग २

 भाग ३

@सौ.शुभांगी सुहास जुजगर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या