सुर तेचं छेडिता …
इंदू ने जरा घाईनेच ब्लाउजची कटिंग केली. आणि लगेच ते शिवायलाही घेतले.
कारण सकाळीच रोहिणी येऊन गेली होती. तीचेच हे ब्लाऊज होते.
आणि ती सांगुन गेली,” की मी संध्याकाळी येते. मला ब्लाऊज तयार पाहिजे.”
म्हणून मग इंदूंनी इतर कामे बाजूला ठेवून, हे ब्लाऊज आधी शिवण्यासाठी घेतले होते. अर्ध्याच्या वर ते शिवून झाल्यानंतर, तिला मिस्टरांचा फोन आला,
”संध्याकाळी येताना माझ्याबरोबर दोन पाहुणे येणार आहेत. तयारी करून ठेव.”
झालं मग हीची अजूनच स्पीड वाढली शिवण्याची,लवकरात लवकर हे ब्लाउज कम्प्लीट व्हायला हवे म्हणुन. गडबडीत तिने मग ते पूर्ण केले. फिटिंग मात्र करायची तिने शिल्लक ठेवली होती.
त्यानंतर ती घरातील सगळे व्यवस्थित करू लागली. इकडे तिकडे पडलेला पसारा तिने आवरला. कपडे सगळे आपापल्या जागेवर व्यवस्थित ठेवले. कॉटच्या शेजारी दोन खुर्च्या मांडून ठेवल्या.समोर टीपाॅय स्वच्छ करून ठेवला. कॉटवरची बेडशीट बदलली.
इतक्यात रूपाही तिच्या मैत्रिणी सोबत कॉलेजमधून आली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
आल्यावर आईची अशी आवरण्याची गडबड बघून तिने विचारले,” आई गंऽ कोणी येणार आहे का आपल्याकडे?”
इंदुबाईनी आवरता आवरताच सांगितले,
“हो, बाबांबरोबर कोणीतरी पाहुणे येणार आहेत.असे त्यांनी सांगितले.”
थोडं थांबून परत इंदुबाई म्हणाल्या ,”तू हात पाय धुऊन आवरून घे.”
“हो हो ठीक आहे. घेते मी आवरून.”
आणि लगेच ती बरोबर आलेल्या मैत्रिणीला म्हणाली,” अनु, आता आपण राहिलेले वर्क रात्रीच कम्प्लीट करू.मला थोडेसे काम आहे.”
“बर ठीक आहे. मी घरी जाते मग.” असं म्हणत अनुजा निघून गेली.
आणि मग रूपा ही आपल्या कामाला लागली.
काही वेळाने रूपाचे बाबा पाहुण्यांना घेऊन घरी आले. रूपाच्या बाबांच्या जवळच्या नात्यातले ते होते.
चहापाणी झाले. त्यानंतर रूपाचे बाबा किचनमध्ये आले. आणि त्यांनी पाहुण्यांचे येण्याचे कारण सांगितले.
ते म्हणाले,” ते दोघेही रुपाला बघायला आलेले आहेत त्यांच्या मुलासाठी.”
हे ऐकताच रूपाच्या आईला राग आला.
त्या रागानेच म्हणाल्या,” माझी मुलगी अभ्यासात हुशार आहे. आणि तिला पुढे शिकुन डाॅक्टर व्हायचे आहे. आणि तुमचे हे लग्नाचे काय मधीच?” आईने प्रश्नार्थक चेहरा करत विचारले.
“ते आहे गं. पण त्यांच्या मुलाला आपली रुपा आवडली आहे. म्हणून ते मुलगी पहायची म्हणाले. तर मला नाही म्हणता नाही आले. त्यांना पाहून जाऊ दे. नंतर बघू आपण. मी सांगेन त्यांना काय सांगायचे ते.” असं म्हणाल्या वर मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला.
इंदुबाई चे हे चौकोनी कुटुंब. त्यांचे पती प्रायव्हेट शाळेवर शिक्षक होते. मोठी मुलगी म्हणजे रूपा आणि मुलगा म्हणजे रितेश.
इंदुबाई याही घरी रिकाम्यावेळी शिवणकाम करत होत्या. साधारण दोन रूमचे यांचे घर होते. रूपा ही हुशार असल्यामुळे, आईला वाटत होते पोरीने शिकून डॉक्टर व्हावे. कारण त्यांना (इंदुबाई)शिकण्याची खूप आवड होती. पण मोठ्या भावाने हिचे काहीही न ऐकता, लग्न लावून दिले होते. त्याचीही काही चूक नव्हती. इंदु सहित या चार बहिणी होत्या. चौघी बहिणींची जबाबदारी मोठ्या भावावर टाकून वडील देवा घरी निघून गेले होते. म्हणून भावानेच जवळच्या नात्यातील मुलं बघून, लवकर लवकरच या चारही बहिणींची लग्न लावून दिले होते. त्यानंतर मग त्याने स्वतःचे लग्न केले होते. म्हणूनच मग आता इंदूला मात्र स्वतःच्या मुली बाबत असे होऊ द्यायचे नव्हते. ‘तीला शिकवायचेच’ या निर्णयावर ती ठाम होती.आणि रूपाची ही तशीच इच्छा होती. त्यामुळे इंदुबाईनी तिला घरातील कोणत्याच कामाचे बंधन ठेवले नव्हते.
‘तुझं कॉलेज आणि तुझा अभ्यास’ एवढेच तिला काम होते. आणि हे बारावीचे वर्ष होते त्यामुळे अभ्यासात कसूर करून चालणारच नव्हते. मार्क चांगले पडले तर मेडिकल ला नंबर लागणार होता नाहीतर…
किही दिवसातच परीक्षा झाली.
रिझल्ट ही लागला. रुपाला मार्क चांगले पडले होते.त्यामुळे तीचा मेडिकलला नंबरही लागला.
§§§§
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
काही वर्षानंतर रुपा डॉक्टर झाली. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत रितेश ही डॉक्टर झाला. पण आज त्याचे हे यश बघायला त्यांचे बाब हयात नव्हते.
ते रूपा मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच अचानक अटॅकने गेले.
रितेश बारावीलाच होता. घरी शेती ही होती. मग ती सर्व आईने विकून टाकली. आणि मुलांचे शिक्षण कम्प्लीट केले.
आता रूपाने तालुक्याच्या गावी हॉस्पिटल टाकले होते. रितेश मात्र पुण्याला एमडी करत होता. रूपाच्या मेडिकल कॉलेजची मैत्रीण म्हणजेच डाॅ. सुजाता. तर ही सुजाता आणि रुपा असे दोघी मिळून हे हॉस्पिटल चालवत होत्या. दोन मोठाले हॉल पेशंटसाठी होते. तर या दोघींच्या केबिन ही वेगवेगळ्या होत्या. दोघींनीही आपापल्या कामाचा वेळा ठरवून घेतल्या होत्या.
शिवाय काही तज्ञ डॉक्टरही, महिन्यातून दोन रविवारी व्हिजिटला येत असे. आणि नेहमीच डिलिव्हरीचे पेशंट मात्र ऍडमिट असायचे.
असेच त्या दिवशी रविवार होता. डॉक्टर सुजाता या बाहेरगावी,काही कामानिमित्त गेलेल्या होत्या. आणि दवाखान्यात रात्री साडेनऊच्या नंतर एक वयस्कर बाई तिच्या सुनेला हॉस्पिटलला घेऊन आली. तिला लेबर पेन सुरू झाली होती.नर्स तिथे हजर होती. तिला ती बाई हात जोडून म्हणाली,
“ डॉक्टरीन बाई सुनबाईला आणला आहे. तिला नववा महिना सुरू झालेला आहे. आत्ताच जराती पाय घसरून पडली.आणि लगेच तिच्या पोटात खूप दुखत आहे. माझा मुलगा म्हणजे तिचा नवरा घरी नाही. काही पण करा, पण तिला दवाखान्यात ऍडमिट करून घ्या. आणि उपचार करा. हात जोडते तुम्हाला.” असं म्हणूत असताना तीच्या डोळ्यात अश्रू दाटले.
तसं पाहून तिने मग डॉक्टर रूपाला फोन केला रूपा नुकतीच घरी गेलेली होती तरीही ती लगेच येते म्हणाली तोपर्यंत तू पुढची तयारी कर.
त्यानंतर पुढील दोन तासात…
म्हणजे बाराच्या नंतर तिची सुखरूप डिलिव्हरी झाली. छान गोंडस असा मुलगा झाला.वजन अडीच किलो भरले.
त्या बाईने अक्षरशः रुपाचे पाय धरले. आणि म्हणाली,”लय लय आभार डॉक्टरीन बाई तुमचे.”
“अहोऽऽ असं काय करताय. माझं कामच आहे ते. त्यात आभार कसले मानता?”
मागे सरकत डॉक्टर रूपा म्हणाली.
“मुलगा घरी नव्हता बाई माझा.. लई दिवसांनी सुनेला दिवस राहिले होते. काही करता काही झाले असते तर.. मला कायम अपराध्या सारखे वाटले असते.”
“अहो मावशी तुम्ही तिला पटकन आणि वेळेवर दवाखान्यात आणले, म्हणून झाले सगळे शक्य..” वाक्य मध्येच थांबवत.. तीने वर बघीतले.
क्षणभर थांबून,”आजी झालात तुम्ही. अभिनंदन.आता बाळाकडे आणि आईकडे लक्ष द्या. सगळं व्यवस्थित झाले आहे काही काळजी करू नका.”असं म्हणत रूपा आपल्या केबिन कडे निघून गेली.
हे ऐकल्यावर ही त्यांना परत भरून आले.आणि नकळतच अश्रू गालांवरुन ओघळले.
सकाळी जेव्हा रूपा हॉस्पिटलमध्ये आपल्या केबिनमध्ये आली. तेव्हा टेबलवर फुलांचा सुंदर बुके आणि पेढ्यांचा बॉक्स ठेवलेला तिला दिसला. तिने बेल वाजवली तर जवळच असलेला राजू पटकन त्यांच्या केबिनमध्ये आला.
आणि म्हणाला,” काय मॅडम.”
“हे कोणी ठेवले?” असे बुके कडे पहात रूपाने विचारले.
“रात्री डिलिव्हरी झाली. त्यांनी आणले आहे.” राजूने सांगितले.
“ठीक आहे.”
“बोलावतो त्यांना मॅडम.” राजुनी सांगितले. मॅडमने नुसतेच राजुकडे प्रश्नार्थक बघितले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
दुसऱ्याच मिनिटाला एक व्यक्ती केबिनमध्ये आली. आणि आल्या आल्या,
“खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. माझ्या पत्नीला योग्य वेळी तुम्ही उपचार केले. आणि तिची सुखरूप सुटका केली त्याबद्दल.”
असे हात जोडत म्हणाली.
“असू द्या, माझी ड्युटीच मी केली.”
“त्यात काय नाही मॅडम. मला आणखी काहीतरी सांगायचे आहे.” ती व्यक्ती.
“बोला. काय सांगायचे आहे.”रुपा.
“माझ्या मावस बहिणीच्या लग्नात तुमची आणि माझी भेट झाली होती. तेव्हा तुम्ही मला आवडला होतात. आणि मी माझ्या बाबांना आणि मामांना तुमच्याकडे, तुम्हाला मागणी घालण्यासाठी पाठवले होते. पण तेव्हा तुमच्या बाबांनी आम्हाला सांगितले होते,’की मुलीला डॉक्टर व्हायचे आहे. आणि आत्ताच लग्न नाही करायचे.”
हे ऐकत असताना रूपाला मात्र गालातल्या गालात हसू आले होते.
“माझ्यापेक्षा माझ्या आईचे स्वप्न होते. मी डॉक्टर होण्याचे. मीच नाही तर रितेश सुद्धा म्हणजे माझा भाऊ डॉक्टरच झाला आहे. पण बाबा आता हयात नाहीत.”सांगताना तिचा कंठ दाटून आला.
“खरंच आईचा खंबीर पाठिंबा होता तुम्हाला म्हणून तुम्ही आज इथं आहात. खरंच खूप खूप अभिनंदन तुमचे, आणि तुमच्या आईचे सुद्धा.”
अभिनंदन करुन ती व्यक्ती निघुन गेली.
(ही कथा पुर्ण पुणे काल्पनिक आहे 🙏 🙏)
सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या