दिवस
वसंत वैभवाचे...
अंजुची स्वयंपाकाची तयारी सुरू होती.
कारण सकाळी सकाळी नऊ पर्यंत, तिच्या मिस्टरांना नाश्ता आणि डब्बा हे दोन्हीही तयार लागत असे. त्यामुळे हिची स्वयंपाकाची गडबड सुरू होती.
पण का कोणास ठाऊक? आज तिचा हातच उचलत नव्हता, सगळ्या शरीरात एक जडत्व आलेलं तिला जाणवत होत. तसाच तिने स्वयंपाक केला. मिस्टरांना नाश्ता देऊन, डबाही भरून दिला.
मुलं दोन्हीही मोठी होती. ती सकाळीच त्यांचे आवरून शाळेला गेली होती. मार्च महिना आणि परीक्षेचे दिवस असल्याने शाळा ही ‘हाफ डे’ होत होती. मोठा मुलगा नववी तर लहाना सातवीत होता.
तिने राहिलेल्या स्वयंपाक कसाबसा आवरला, आणि काही वेळातच तिला अंग दुखण्याचे आणि जड होण्याचे कारण कळाले. पायातही मुंग्या येत होत्या.
म्हणून तिने मग आरामच करायचं ठरवलं. काही वेळाने मुलं शाळेतून आली.
तर त्यांना तिने,”हाताने वाढुन घेऊन दोघेही जेवण करा.मला जरा बरे नाही. मी जेवेन नंतर” असं सांगितलं.
मोठा मुलगा अजिंक्यने तिला विचारले,”आई बरं नाही तर गोळी घेणार का? नाही तर दवाखान्यात जायचे आहे का? चल मी तुझ्याबरोबर येतो. नाहीतर पप्पांना फोन करू करतो.”
“अरे थांब किती प्रश्न..”तीने मध्येच थांबवत म्हटले.
“तू अशी झोपलेली. मला नाही जेवण करायचं.” असं लहान अथर्व रडवेला सुरात म्हणाला.
“ते काही नाही. दोघेही जेवा आणि अभ्यासाला बसा. मी जेवेन काही वेळाने, बरं वाटेल तेव्हा. जा दोघेही हात पाय धुऊन घ्या.”
रागावूनच त्यांना म्हणाली,
कारण प्रेमाने सांगितले असते तर त्यांनी पटकन ऐकले नसते.
असं आईने सांगितले. त्या मुळे दोघेही हात पाय धुण्यासाठी बाथरूम कडे गेली.
अंजु बेडवर पडल्या पडल्या विचार करू लागली. की तिला आता हे नेहमीच होऊ लागले होते.प्रत्येक महिन्यातील या तीन दिवसांत.खरंच स्त्रीला या दिवसात विश्रांतीची गरज असते.आता या वयात तर तिला उठुन काही करावेसेच वाटत नव्हते.
आणि तीची चीडचीड ही जास्तच होत होती.
पण चीडणार तरी कोणावर? मिस्टर सकाळी सकाळीच ऑफिसला निघुन जात होते.तर मुलं ही शाळेला…दिवसभर फक्त ही एकटीच घरी असायची.
अंजली मनात हा विचार करता करताच तीला
लग्न झाल्या नंतरचे ते दिवस आठवले…
लग्नानंतरची पहिलीच ती वेळ होती.सासुबाईने तीला,”कोणतेच काम करू नको.”असे सांगितले.
वर त्या अश्याही म्हणाल्या,” घे विश्रांती, ही हक्काची विश्रांती आहे स्त्रियांची.तेव्हा काहिही वाटुन देऊ नकोस.”
मला मात्र अपराध्यासारखं वाटत होतं. कारण लग्नापूर्वी ही माहितीच नव्हती.त्यांच्या या म्हणण्याचे महत्व आता कळते आहे.
मग सकाळीही उशिरा उठायचे. उठल्या नंतर अगदी ऊन ऊन पाणी तोंड धुवायला त्या द्यायच्या. त्यानंतर चहा.. नऊ वाजता नाश्त्याची प्लेट समोर येत होती.
मिस्टरही स्वतःचे सगळं अगदी स्वतःच्या हाताने आवरून घेत होते. आणि परत मलाही विचारायचे, “की तुला काय देऊ?”
परत दुपारी स्वयंपाक झाला की गरम गरम सासऱ्यांना त्या वाढून देत होत्या. आणि लगेच मलाही वाढून द्यायच्या.अन् म्हणायच्या,
“की घे जेवून, गरम आहे तोवर. विजू (मिस्टर)ची वाट नको बघूस, तो जेवेल माझ्यासोबत, तू घे जेवुन.”
अगदी मोठ्या ताटात मला त्या वाढून देत असत. वरण, भात, भाजी, पोळी सोबत चटणी किंवा लोणचे असायचे.
अंजूला असे असले, की घरातले सगळे काम सासूबाईंनाच करावे लागत होते. घरात सासू-सासरे आणि एक दीर असे पाच जणांचे कुटुंब होते.
दुपारच्या वेळी ही,”करमत नसेल तर काहीतरी वाचत बस. तेवढाच वेळ जातो.” असं त्या सांगायच्या.
सासरे पेपर आणत होते. मग तेही दुपारी त्यांचा वाचून झाला की,
अंजूला पेपर देत म्हणायचे,”की वाच बाई.”
तीन-चार दिवस मग असेच होते.
‘नो काम, फक्त आराम’
तोच आराम अंजूला आज या घडीला हवाहवासा वाटत होता. पण आज.. कुठे होता तो?
एवढ्यात अथर्व जेवण करून तिच्याजवळ आला.
तिच्या हाताला हलवत म्हणाला, “आई माझं जेवण झालं आहे. तू कधी जेवणार? भैय्या जेवतो आहे?”
त्याने हाताला हलवल्यामुळे अंजूची लागलेली तंद्री भंगली.मुलाचा प्रश्न ऐकून ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली,”जेवलास ना बाळा बर झालं. मी बरं वाटल्यावर जेवेन..”
परत थोडे थांबून..
“जा अभ्यास कर. होमवर्क दिले असेल ना सरांनी?”
“हो दिले आहे, पण मी ते रात्री करणार आहे.” अथर्व म्हणाला.
“बरं जा.” असं म्हणत तिने आपले डोळे मिटून घेतले.
थोडा वेळ झोप लागली. नंतर तिला जाग आली. तर तेव्हा थोडे बरे वाटले तिला. कारण एनर्जी सरबत तीने घेतले होते.
त्यानंतर उठून तिने जेवण केले. आणि परतही तिने आरामच करायचं ठरवलं. म्हणून येऊन ती आणखी काॅटवर आडवी झाली.अन् पडल्या पडल्या परत ती जुन्या आठवणी हरवली..
लग्न झाल्यानंतर नवीन नवीन तिला या अवस्थेमध्ये थोडेसे ऑकवर्ड फील होत होते..
‘मी जणु काही तरी अपराध केला आहे की काय?’असा तीला प्रश्न पडत असे.
आई कडे असताना म्हणजे लग्नापूर्वी आईने असे एकदाही केले नव्हते. हा मात्र जेव्हा हीने माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच दस्तक दिली. तेव्हा आजीने तीचे या दिवसात खाण्याचे लाड केले होते.
आणि पाच दिवसांनंतर एक छोटासा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला होता.मला छान पोपटी रंगाचे जाकिट असलेला ड्रेस घेतला होता.तेव्हा मला खुपचं लाजल्या सारखे झाले होते.
तर शेजारच्या काकू म्हणाल्या होत्या,”अगं लाजु नको, स्त्री च्या आयुष्यवेली वर फुललेले हे खुप सुंदर फुल आहे.”
त्यांचे हे वाक्य मला नंतर प्रत्येक अश्या वेळी नक्कीच आठवत होते.
पण नंतर सवय झाली. मग तिने ‘या वेळेत आपण काय करू शकतो?’हा प्रश्न मनाला विचारला.
मग तिला वाचनाची आवड असल्याने लायब्ररी लावली. संध्याकाळच्या वेळी जाऊन एक पुस्तक बदलुन दुसरे पुस्तक आणायला लागली. नामांकित लेखकांची पुस्तके ती वाचत होती. मग या तीन चार दिवसात तर तिला वाचनासाठी भरपूर वेळ मिळत असायचा. मग पुढे थोडे थोडे लिखाण करण्याचाही ही आवड तीला निर्माण झाली.
पण पुढे मुलं झाली आणि मग त्यांचे करण्यात, घरातले सगळे करण्यात तिचा वेळ कसा निघून जात असे तिचं तिलाच कळत नव्हते.
लायब्ररी तर बंदच होती. पण आहे त्या पुस्तकावर सुद्धा धूळ जमा झालेली होती. सासुबाई थकल्या होत्या. त्यांना आता काहीच काम होत नव्हते. बरं त्यांचे आजारपणही वाढले होते. त्यामुळे निवांत असा वेळ अंजूला मिळतच नव्हता.
पण आता मात्र तसं नव्हतं. आता तिच्याकडे वाचण्यासाठी भरपूर वेळ होता. म्हणून वाचन मात्र सुरू होते. पण लिहिण्यासाठी लेखणी उचलत नव्हती.
हल्लीच ‘सुंदर पत्रे’ हे साने गुरुजींचे पुस्तक वाचनात आले होते. त्यातील त्यांनी लिहिलेली ‘सुधाताईस पत्रे’ खूपच बोधप्रत आणि संस्कारक्षम आहेत.
साने गुरुजी हे आपल्या कामा निमित्त संपूर्ण भारतभर फिरत असतं. या फिरण्याच्या कालावधीत त्यांना निरनिराळे अनुभव येत असत.बघीतलेले नीरनीराळे सृष्टी सौंदर्य ते डोळ्यात साठवून ठेवत असत.त्यांचे वाचनही खुप होते.
अश्याच काही चांगल्या आठवणींच्या, सुमधुर आणि सुंदर स्मृतींची टपोरी सुगंधी फुले भरलेला द्रोण ते प्रत्येक शनिवारी सुधाताईंना लिहून पाठवत होते.
हे लिहिताना, वाचणाऱ्यांच्या मनावर सुसंस्कार व्हावेत, हा हेतू मनात ठेऊनच,अगदी सहज आणि सोप्या भाषेत ते समजावून देत असत. मग त्यासाठी म्हणी, ओव्या, अभंग, आर्या, श्लोक, ऋचा इत्यादींचा वापर ते अगदी योग्य रीतीने करत असत. त्यांनी लिहिलेली ही सुंदर पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळाना घडविण्यात सिंहाचा वाटा नक्कीच आहे. त्यांनीच लिहिलेली श्यामची आई ही सर्व महाराष्ट्राची आई झाली आहे.
(ही कथा पुर्ण काल्पनिक आहे.)
सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या