फॉलोअर

राधा ही बावरी.. भाग चार

राधा ही बावरी.. भाग चार 



Source: google


नीरज ने घरी आल्यावर, तिकडे झालेले सगळे वडिलांना सांगितले.तर हे ऐकल्यावर ते फारच खुष झाले.आणि ते म्हणाले,
”तुझ्यावर जर तिचे मनापासून प्रेम असेल, तर मला आनंदच आहे. त्यामुळे तुझ्या बाबतीत मी चिंतामुक्त होईल. नीलिमालाही मी ताईच्या घरी दिल्यामुळे, तिच्या बाबतीत ही निश्चिंत झालो आहे. कारण ताई मुळे तिला आईची उणीव कधीच भासणार नाही. आणि आता तू ही म्हणतो आहेस की, ही माझी खूपच बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे माझी आता काळजीच मिटली बघ.” नीरजचा हात हातात घेऊन दिलीपराव म्हणजेच त्याचे वडील म्हणाले. 

बाबांनी या लग्नाला संमती दिल्याबद्दल त्यालाही आनंद झाला होता. “तुम्ही तयार आहात बाबा? माझ्या या लग्नाला तुमची काहीच हरकत नाही?” पुन्हा खात्री करून घेण्यासाठी नीरजने बाबांना विचारले.
 
“नाही बेटा, जीवनात योग्य जोडीदार मिळणे, याला भाग्यच लागते. आणि ते तुला लाभलं आहे. नाहीतर आमचं..? तुझी आई गेल्यापासून नुसतेच अडखळत अडखळत जगणं सुरू आहे. फक्त तुम्हा दोघांचे आयुष्य हे व्यवस्थित मार्गाला लागलेले बघीतले की…” खंतावलेल्या सुरात बाबा म्हणाले.

आता पुढे..

बेडरूममध्ये अर्धवट झोपलेल्या मीनाताईंने, म्हणजेच नीरजच्या सावत्र आईने हे दोघा बापलेकाचे बोलणे ऐकले.
मग त्या उठून डोळे चोळत चोळतच बाहेर आल्या. आणि येता येताच त्यांनी विचारले,
“ काय झाले? कोणाचे लग्न ठरले आहे? पण मला कोणीच का नाही सांगितले?”
“अगं मला आत्ताच तर सांगतो आहे हा. ठरलं म्हणजे फक्त त्यानी विचारलं आहे.”
नीरजच्या बाबांनी तिला सांगितले.
“आता भाऊला काय सांगायचं? तो नीरज साठी ‘माझी मुलगी रोशनी करा.’ असं किती दिवस झाले मागे लागला आहे.” 
नाराज होत मीनाताई म्हणाल्या.
आईच हे असं बोलणं ऐकून नीरज बाबांकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागला. त्याच्या नजरेतले प्रश्न आणि त्याच्या मनातला उडालेला गोंधळ बाबांनी जाणला. म्हणून मग तेच म्हणाले.
“मीना या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आपण निमित्त मात्र असतो. त्याला ती आवडली आहे, दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे.”
नवर्याचे असे ऐकल्यावर ही त्या म्हणाल्या,”तुम्ही तर लगेच मोकळ्या मनाने परवानगी देऊन टाकली आहे.मुलगी कशी आहे? माणसं कशी आहेत?हे काहीही न बघताच हो म्हणालात.?”
“चला ना दोन दिवसात आपण जाऊ दोघेही. मुलगीही बघू आणि भेटूनही येऊ.” नीरजचे बाबा म्हणाले.
“माझ्या भावाची मुलगी ही छानच होती ना, शिवाय शिकत आहे अजून, तिलाही नीरज आवडतो म्हणाली इथे आली तेव्हा.. आता भाऊ नाराज होणार.” असं त्या खंतावत म्हणाल्या .
.इतक्यात नीरजचा फोन वाजला. अबोलीचा फोन होता.म्हणुन तो उठून वरच्या रूममध्ये गेला. तरीही या दोघांचे या विषयावर बोलणे चालुच होते.

नीरज वर रूम मध्ये आला, तर येईपर्यंत फोन बंद झाला होता.म्हणुन मग परत त्याने फोन केला.
“कीती दिवसांनंतर फोन केला आहे मॅडम?”
त्याने असा प्रश्न विचारला.
“काय बोलू, मला काहीच कळेना झाले आहे.
विचारले आहे का आई बाबांना?”अबोलीचा प्रश्न.
“सब्र का फल मिठा होता है.अबोली मॅम.”थोडं थांबुन तो परत म्हणाला,”हो विचारतो ना.आता काय घाई आहे गं.लग्नाची तारीख तर उलटुन गेली आहे ना?अन् तो चष्मीश मला भांडायला आला तर…?”
अबोलीला त्याने चिडवले.
हे ऐकून ती ही चिडली आणि म्हणाली, “माझ्यासमोर परत त्याचे नाव काढू नको. नाहीतर मी तुझ्याशी कट्टी करेन”रागातच अबोली म्हणाली.
“मग काय? मग काय? आता नाकाचा शेंडा लाल झाला वाटतं.”नीरज.
“हो हो ठेवते आता मी फोन.” असं नाक फुरफुरत अबोली म्हणाली.आणि तिने फोन कट केला. 
नीरज ने ही फोन ठेवला.
पण त्याच्यासमोर घरातील चित्र उभे राहू लागले. आपले आणि या आईचे सूर कधी जुळलेच नाहीत. कामापुरते दोन-चार वाक्य बोलायचे, पण तिला तेवढं बोलणेही जड जात होते. आई गेल्यापासून नीरजला आईचे प्रेम हे बाबांनी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी या दोघांना कधीच नजरेआड होऊ दिले नाही. नीरज शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर होता तेवढाच. पण नीलिमाचे ग्रॅज्युएशन इथेच त्यांनी केले होते. 

नीरजला मात्र आईची आठवण या क्षणी तीव्रतेने येऊ लागली. 

मी तेव्हा जेमतेम पाच वर्षाचा असेल …
त्या दिवशी सण होता. आई आणि आजी या दोघीही दिवसभर स्वयंपाक घरात, स्वयंपाक करत होत्या. बैठकीत पलंगावर महालक्ष्मीं बसलेल्या होत्या. बाबा तिथेच काहीतरी करत होते. आणि छोटी नीलिमा झोक्यात होती तर, तिला बाबा मधुन मधुन झोकाही देत होते. आणि कामही करत होते. मी मुलांसोबत बाहेर खेळत होतो. 

संध्याकाळी पूजेच्या वेळी, बाबांनी मला तयार छान केले. तेही कपडे घालून तयार झाले. आईने दारासमोर रंग भरून रांगोळी काढली होती. आणि सगळं अंगणभर तिने लक्ष्मीची पावलेही काढलेली होती. त्यानंतर तिने मस्त साडी घातली. गळ्यात दागिने घातले.कपाळी कुंकू लावले. आणि मग आम्ही सगळेजण आरती करू लागलो. पण आरती करताना माझे लक्ष मधूनच लक्ष्म्या कडे जात होते.तर मधुनच मी आईला ही न्याहाळत होतो. आणि मनात म्हणत होतो की,’आज तर माझी आईच मला लक्ष्मी दिसत होती.’
असं वाटत असतानाच, मी हळूच तिच्या जवळ जाऊन तिचा हात धरला. आणि साडी वरूनही तो हळूच फिरवला होता. छान मऊ मऊ तो साडीचा स्पर्श आणि तिला येणारा तो नुकताच पेटीतून काढून नेसलेल्या त्या काठाच्या साडीचा वेगळाच वास.. जणू आजही तो तसाच नाकातून अंतरंगात दरवळत होता. हाताने केलेला तो साडीचा स्पर्शही जसाच्या तसाच आठवत होता. मला आजही ते मनात साठवलेलेच आईचे रूप राहून राहून आठवत राहते. 
तो आईने केलेला शेवटचा सण…

त्यानंतर काही दिवसांनी, आई मोठे कपडे धुण्यासाठी नदीला गेली. तिथे पाय घसरून ती पाण्यात पडली. मात्र तिला बाहेर निघताच नाही आले. बाबा बाहेरगावी म्हणजेच खेड्यावरील शाळेवर ड्युटीला होते.

झाले त्या दिवसापासून आम्ही दोघे बहिण भाऊ आईच्या मायेला पारखे झालो. मला तरी आई आठवते. पण निलिमाला तर काहीच आठवत नाही. तिला फक्त फोटोतच आई दिसते. 
टीव्ही बघताना असे सिन आले की म्हणजे, आई मुलीचे किंवा आई आणि मुलांची तर आम्ही दोघेही त्याकडे एक टक लावून बघायचो. खरंच जी गोष्ट आपल्याकडे नसते तिची किंमत तेव्हाच कळते. तसेही आम्हाला आजीने आणि बाबांनी खुप माया लावली आहे.पण…आईची माया ती आईचीच असते.


आई गेल्यानंतर, आजीने बाबांचे दुसरे लग्न तीच्याच नात्यातील मुलीशी म्हणजेच मीनाशी लावुन दीले. पण घरात मात्र तीचे या लेकरांशी प्रेमाचे बंध कधीच जुळले नाही.
सुरवातीला तीला या अशा लग्न झालेल्या, शिवाय दोन मुलं असलेल्या मुलाचे स्थळ पसंतच नव्हते,पण वडिलांच्या ईच्छे पुढे हीचे काहिच चालत नव्हते.वडिलांची गरिबी होती.आणि कमाईच्या मानाने घरात खाणारी तोंडेअधिक त्यामुळे हे तीने नाविलाजास्तव स्वीकारले होते. वडिलांनी विचार केला की ‘नोकरी करणारा मुलगा आहे. आपली मुलगी आयुष्य भर आरामात राहिल.

मुलांशी नीट ओळख होईपर्यंत सहा महिने निघून गेले.आणि त्यानंतर तीलाच मातृत्वाची चाहूल लागली.
काहि दिवसांनी तीला मुलगा झाला.आता त्याचे करण्यात आणि घरातले करण्यातच तीचा वेळ जात होता.त्यानंतर परत दोन वर्षांतच तीला मुलगी झाली.
मुलगा राज आणि मुलगी रूपाली.

नीरज चे राज बरोबर चांगले जमत होते.भाऊ म्हणुन तोही नीरज चे ऐकत होता.शिवाय अभ्यासातही त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन 
ही तो करत होता.निलिमाचेही आईशी फारसे जमलेच नाही.ती करत असलेला दुजा भाव तीला खटकत होता.ती मग आजीकडुनच तीचे सर्व काही करून घेत असे.तीचे आणि राजचेही जमत होते.मात्र रूपालीशी तीचे सुत जुळलेच नाही.दिलीपराव ही मुलांमध्ये एकोपा टीकवण्याचा नेहमीच प्रयत्न करत होते.पण काही बाबतीत मात्र ते असफल ठरत होते.
तेव्हा त्यांना राहुन राहुन असं वाटायचं,’या दोन मुलांचे संसार एकदा मार्गी लागले की गंगेत घोडे न्हाले.

होऊ देईल का ही नीरज चे लग्न अबोली बरोबर?
बघुया पुढील भागात..
(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे)
@ शुभांगी जुजगर.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या