फॉलोअर

आई माझ्या लग्नाची गं...

 आई माझ्या लग्नाची गं...


संध्याला उशीर झाला म्हणून..
ती स्पीडने स्कुटी चालवत होती. शाळेच्या आवारात तिने प्रवेश केला. तेव्हा तीला प्रार्थना ऐकु आली. आणि गाडी पार्क करून शाळेच्या गेटच्या मध्ये येईपर्यंत राष्ट्रगीत तीच्या कानावर पडले. तशी ती जागीच उभी राहिली.
प्रार्थना संपल्यानंतर सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले.

 दहावीपर्यंत असलेली ही शाळा होती. ग्रामीण भागात असणाऱ्या या शाळेवर, संध्या मॅडम या गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होत्या.म्हणजे इयत्ता आठवी ते दहावी या वर्गाला त्या हिंदी हा विषय शिकवत होत्या.

नववी या वर्गाच्या त्या वर्गशिक्षिका होत्या. या शिकवण्या बरोबरच त्यांना सामाजिक कार्याची ही आवड होती. 
त्या हजेरी रजिस्टर घेऊन वर्गावर निघाल्या. 
नववी वर्गाच्या खिडकीजवळ त्यांना संगीता मॅडम भेटल्या. ज्या तीन दिवसानंतर शाळेवर आल्या होत्या. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तीन दिवस रजेवर गेल्या होत्या.
म्हणुन त्यांच्या तब्येती विषयी चौकशी करावी म्हणुन विचारले,”काय मॅडम बरे आहे का आता?” संध्या मॅडम.
 “होऽ, आज बरे वाटते आहे.” संगीता.
“काय झालं होतं! असं अचानक?” संध्या.
“अहो त्या दिवशी लंच टाईम नंतर, माझं शाळेत लक्षच लागेना.अंगात नुसतं कणकण होत होतं.आणि किंचित तापही भरलेला होता. मग घरी जाऊन लगेच हॉस्पिटलला गेले. तर तेथे जाईपर्यंत ताप आणखी वाढला. त्याबरोबरच विकनेस पण आला. म्हणून मग ऍडमिटच व्हावे लागले. पण साधेच व्हायरल इन्फेक्शन होते.” “ठीक आहे, काळजी घ्या.” संध्या. 

मॅडम
असं म्हणत त्या वर्गात आल्या.पण हे संभाषण चालू असताना, ज्या खिडकीजवळ त्या उभ्या होत्या, त्या खिडकीत आतील बाजूला मुली बसलेल्या होत्या. आणि त्यांच्यातील चर्चा या मॅडमच्या कानावर पडली.
 तर त्यातील एकीचा म्हणजे जयश्रीचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. आणि काहीच दिवसात लग्नही होते. 

संध्याने हजेरी घेतली, आणि त्यानंतर शिकवण्यास सुरुवात केली.  
तास संपला, तशी ती जायला निघाली. आणि जाता जाता मुलींजवळ थांबून तिने सर्वांकडे पहात प्रश्न विचारला,
”कोणाचे लग्न ठरले आहे?”
तेव्हा सगळ्याच लाजल्या. आणि त्यांनी नकळत आपले हात तोंडावर ठेवले. त्या सर्वजणी जयश्री कडे पाहू लागल्या. तिने तर मानच खाली घातली होती.

“मी विचारले, कोणाची लग्न ठरलेआहे?”
संध्याने परत विचारल्यावर जयश्री च्या शेजारी बसलेल्या कविताने हळूच तिच्याकडे बोट दाखवत सांगितले,” तिचे ठरले आहे मॅडम.”
 
“काय हो का गं जयश्री?”
जयश्रीने मॅडम कडे न बघता मानेनेच होकार दिला.
“आणि शाळा सोडून द्यायची?”


हा मॅडमचा प्रश्न ऐकून कोणीच काहीही बोललं नाही, म्हणजे उत्तर दिले नाही.
“अगं पहिल्या पाचात येणारी, तू मुलगी आहेस ना?”

संध्याच्या मनात अनेक प्रश्न चक्राकार फीरत होते.त्यातीलच हा एक प्रश्न तीने विचारला होता.
काहीवेळा नंतर जयश्री म्हणाली,
“हो मॅडम मला शिकायचे होते,मला अभ्यास करायला ही आवडतो.पण आई बाबा ऐकेनात.”असं नकारार्थी मान हलवत ती बोलली.
“का बरं ऐकेनात?”असा मॅम चा प्रश्न. 
“माहित नाही.. म्हणतात ‘आम्ही दोघीही ऊस तोडीला जाणार आहोत आणि भैया तिकडे लांब कॉलेजमध्ये शिकतो आहे.” 

“असं होय.”
असं म्हणत त्या दुसऱ्या वर्गावर निघून गेल्या.

जयश्री ही पाचवीपासून पहिल्या पाचात येणारी मुलगी. स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह असायची. शिवाय इतर स्पर्धांमध्ये ही ती भाग घेतच होती. अक्षर सुरेख होते शाळेमध्ये साजर्या होणाऱ्या जयंती आणि पुण्यतिथी यामध्येही तिचे भाषण असायचेच. ते ती स्वतः लिहीत असे. 
आई-वडील मजुरी करत होते. घरी दोन तीन एकर शेती होती. त्यात जे पिकत होते त्यावर घराची गुजराण होत नव्हती. म्हणून मग इतरांच्य शेतावर काम करत होते.आणि म्हणुन आपल्या पेक्षा सुस्थितीत असणार्या मुलाचे स्थळ आले होते. त्यामुळे नकार न देता लगेच लग्न ठरवले होते.कि ‘आपल्या पेक्षा मुलगी सुखात राहिलं.’या उद्देशाने.ऊस तोडीला दोघेही गेल्यावर ही पोरगी एकटीच घरी राहिल म्हणुन..या आधी तीचा भाऊ हा येथेच होता.पण आता तो
काॅलेजला मोठ्या शहरात गेला होता. हा प्रश्न त्यांच्या समोर होता.म्हणुन त्यांनी हीच्या लग्नाचा निर्णय घेतला होता.


संध्या सर्व आवरून बेड वर आडवी झाली.पण झोप मात्र येईना.
जयश्री चा विचार मनातून काही केल्या जात नव्हता, चौदा वर्षाची पोर ही बोहल्यावर चढणार होती.
या वयात मुलीचे लग्न करणे म्हणजे अपराध आहे.असं मन पुन्हा पुन्हा सांगत होते.तिचे हे वय अल्लड,अवखळ आहे.खेळण्याचे बागडण्याचे आहे.ना की संसाराची
धुरा सांभाळण्याचे.. लग्ना नंतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.असे सगळे विचारांचे चक्र सुरू होते.या कुशीवरून त्या कुशीवर ती वळत होती.खीडकीतुन आलेला चंद्रप्रकाशाचा कवडसा तीला दीसला, म्हणून तीने खिडकीतून बाहेर बघत चंद्राला न्याहाळत डोळे मिटून घेतले.मग नंतर तीला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी..
तिने मग हे एका जिवलग मैत्रिणीबरोबर शेअर केले. सगळे तिला सांगितले. आणि ‘हिच्यासाठी काहीतरी करावे’ अशी माझी तीव्र इच्छा आहे. असेही तिला सांगितले. यावर तिने ‘बघते’ असं म्हणाली. ती सोशल वेल्फेअर मध्ये काम करत होती.
“या दोन मैत्रिणीच्या प्रयत्नांना यश मीळु दे देवा.”अशी प्रार्थना 
संध्याच्या आईने देवापुढे केली.

संध्या बरोबर तीची आई ही नोकरी च्या गावी राहत होती.तीला सोबत म्हणुन. 

त्यासंदर्भात असणाऱ्या काही गोष्टींची माहिती मिळवून संध्याच्या मैत्रिणीने संध्याला दिली. त्यादरम्यान जयश्री च्या आई वडिलांची संध्याने भेट घेतली.
जयश्री चा होणारा हा विवाह बालविवाह आहे हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
तीच्या आईला संध्याने सांगितले,

“या होणाऱ्या विवाहामुळे तिचे शिक्षण थांबेल. आणि त्यामुळे तिच्या मानसिकतेवर परिणाम होईल, मनावर परिणाम होईल, आणि तिचा विकासही थांबेल, लग्नानंतर येणारे मातृत्व.. यासाठी मुळात तिचं शरीर अजुन तयार नाहीये. कदाचित तिच्यावर या मातृत्वामुळे काही अघटीत…..”
पुढचं तिच्याकडून बोलवलं गेलं नाही. 
हे ऐकून तिचे वडील काहीच बोलले नाही पण आईने सांगितले की,
“बाई, आमचं असं दुसरं काय बी न्हाई. पर आम्ही दोघंबी ऊस तोडीला लांब जातो. मोठा पोरगा इथे नसतो. मग तिच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. तिला जपणारं कोण बी न्हाई…त्यामुळे लगीन झालं की ती तिच्या घरी सासरच्या छायेत आबाद राहीन.. म्हणून.”
यानंतर वडिलांनीही त्यांची बाजू मांडत सांगितले,
“बाई पोराच्या शिक्षणासाठी काही पैशाची उचल घेतली आहे. ती फेडण्यासाठी हे ऊस तोडीला जायचे आहे. एकदम रक्कम येते हातात. त्या योगे कर्ज पाणी फीटून जातं.”
यावर संध्या,” कर्ज फिटून जाईल. पण ती एकदा का संसारात पडली, की तिचे शिक्षण, तिचं स्वप्न हे स्वप्नच राहील, शिवाय आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा वेगळाच. शिवाय वेळेआधीचे मातृत्व तिच्यावर लादले जाईल. त्यामुळे त्या बाळाचे आरोग्य आणि संगोपन याच्यावरही विपरीत परिणाम होतील.हा होणारा बालविवाह थांबवा…”
शेवटचे वाक्य म्हणताना तीच्याही नकळत डोळ्यांत अश्रू तरळले होते.

  
एवढं सांगुन ती निघुन आली.



 
 .. आणि जयश्रीचा हा कमी वयात होणारा विवाह त्यांनी थांबवला. आणि ज्या काही अडचणी होत्या. त्या सोडवून तिचे शिक्षण सुरूच ठेवले. तर दहावीला याच मुलीने ऐंशी टक्के मार्क घेतले कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तिलाही शहरात पाठवले गेले. शासकीय योजनांचा आणि मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा तिला लाभ मिळवून दिला.

या दरम्यान आणखीही काही असेच विवाह त्यांनी थांबवले
काही मुली स्वतःहून संध्या मॅडम कडे त्यांचे लग्न ठरल्यानंतर येऊ लागल्या तर काहीवेळा मुला मुलींच्या आई वडिलांना समजावून सांगत तर काही पोलिसांच्या मदतीने म्हणा किंवा या कार्यक्षेत्रात कार्यशील असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने संध्या मॅडमने हे काम चालूच ठेवले. बालविवाहाचे परिणाम विशेषता मुलींच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे त्यां पटवून देऊ लागल्या. यामध्ये शाळेतील विद्यार्थिनीच जास्त होत्या. 
असेच मग त्यांचे कार्यक्षेत्र वाढले. यासाठी त्यांना स्वयंसेवी संस्थांची मदत होऊ लागली असेच कार्य त्यांनी चालूच ठेवले त्यापैकी अनेक मुलींनी उच्च शिक्षणही घेतले. आणि त्या सर्व विविध क्षेत्रात कार्यरत झाल्या आहेत. काही अर्थार्जनही करू लागल्या आहेत.

पुण्यातील एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने, संध्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन, 
तीचा योग्य तो सन्मान करण्यासाठी तनीष्क हाॅल, कात्रज पुणे येथे आमंत्रित करण्यात आले होते.

(वरील करा ही पुर्णपणे काल्पनिक आहे.🙏🏻)
@सौ. शुभांगी सुहास जुजगर.
 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या